मुंबई – शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांसह बंडखोरी केल्याने शिवसेनेचा महाराष्ट्रातील बालेकील्ला ढासळला आहे.शिंदे गट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार संघर्ष सुरु असून तमाम शिवसैनिक बंडखोर आमदारांच्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर स्वतः
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अॅक्शन मोडमध्ये आले असून तळागळातील शिवसैनिकांना निर्देश देण्यात आले आहेत.याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस प्रमुखांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ‘हाय अलर्ट’ राहण्याचे आदेश दिले आहेत.विशेषत: मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गोंधळ घालू शकतात. त्यामुळे राज्यातील पोलिसांना सतर्क राहण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. तसेच बंड केलेल्या आमदारांच्या घरी व कार्यालयाबाहेर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाने राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातल्याने शिवसैनिकांनी मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांना गद्दार बंडखोरांना सोडणार नाही, असा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तसेच एकनाथ शिंदे समर्थकांनी लावलेले बॅनरही फाडण्यात आल्याने शिंदे गट आणि शिवसेनेचा संघर्ष आणखीनच पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.