पुणे – जून महिना बहुतांशी कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यात गेल्या आठवडाभरापेक्षा जास्त दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवसांत या पावसाचा जोर ओसरणार, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यातही पावसाचा हाहा:कार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूर्व विदर्भातही पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. पालघर, जव्हारसह मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव, घाटमाथ्यांवर पावसाच्या सरीवर सरी सुरूच आहेत.
दक्षिणेकडे असलेला मान्सूनचा आस, राज्याच्या मध्यभागावर पूर्व-पश्चिम दिशेने वाहणारे परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र या प्रणाली सक्रिय आहेत. तसेच अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात जोरदार पाऊस पडत होता. त्यातच आता मान्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून पूर्व किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र ओसरण्याची चिन्हे आहेत. परिणामी पुढील तीन-चार दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.