मुंबई – जुलैच्या सुरुवातीपासून राज्यातील विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मात्र आता पावसाने उसंत घेतली आहे. पावसाला पोषक वातावरण निवळल्याने जोर ओसरल्याचे चित्र आहे. परंतु आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असून पुढील ४ ते ५ दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी अधूनमधून जोरदार सरींसह हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागात धुवाधार पाऊस कोसळला. अनेक नद्यांना पूर आले. मात्र आता पावसाचा जोर कमी झाला असल्याने नद्यांची पाणीपातळी पुन्हा घटली आहे. दोन दिवसांपासून राज्यात पावसाने उसंत घेतली आहे.