इस्लामपूर- 14 वर्षांपूर्वी कोकरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. राज ठाकरे यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हा आदेश दिला आहे. तर शिराळा न्यायालयातील खटल्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याचे निर्देश राज ठाकरे यांना देण्यात आले आहेत.
राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर त्यांच्या वकिलांतर्फे राज ठाकरे हजर राहू शकत नसल्याचे न्यायालयीन सुनावणीदरम्यान सांगण्यात आले होते. तसेच त्यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, ही मागणी शिराळा कोर्टाने फेटाळून लावली होती. त्यानंतर या निकालाविरोधात इस्लामपूर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणीदरम्यान, न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.