शिर्डी – भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्याच गावात जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोणी खुर्द सहकारी सेवा सोसायटीत विखे यांच्या गटाचा सर्वच्या सर्व १३ जागा जिंकत दारुण पराभव करत २० वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील नेतृत्व करत असलेल्या शिर्डी मतदार संघात सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यातील अनेक सोसायट्या बिनविरोध करण्यात विखे पाटलांना यश आले आहे. मात्र,आता विखे पाटलांना त्यांच्याच लोणी गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनार्दन घोगरे यांनी जोरदार धक्का दिला आहे.
लोणी खुर्द गावात राष्ट्रवादीच्या जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन मंडळाने बाजी मारत विखे गटाचा सर्व १३ जागा जिंकत पराभव केला. या विजयानंतर परिवर्तन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.दोन वर्षांपूर्वी लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीतही जनार्दन घोगरे यांच्या पॅनलने विखे गटाचा पराभव करत ग्रामपंचायतीवर वर्चस्व स्थापन केले होते.आता पुन्हा सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घोगरे यांनी दणदणीत विजय मिळवून २० वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले. विखे गटाला पराभवाचा सामना करावा लागल्याने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात या निकालाची चर्चा होत आहे. तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात देखील विखे गटाचा पराभव झाला. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मंडळाने सर्व जागांवर विजय मिळवत विखे गटाचा १३-० असा पराभव केला आहे. थोरात यांचे जन्मगाव असलेले जोर्वे हे गाव शिर्डी विधानसभा मतदारसंघात जोडले असले तरी विखेंचा करिष्मा गावात दिसून आला नाही. दोन्ही गावच्या सोसायटी निवडणुकीत विखेंना धक्का बसला असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका रंगतदार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.