उरण, प्रतिनिधी- रानसई धरण क्षेत्रात गेल्या चार पाच दिवसात चांगला पाऊस झाल्यामुळे बुधवार मध्यरात्री २ वाजता धरण ओव्हरफुल होऊन वाहू लागल्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे. सध्या या धरणाची पाण्याची पातळी ११६.५ फुटांच्या वर असल्याची माहिती एमआयडीसीच्या येथील कार्यालयाचे उप अभियंता चौधरी यांनी दिली.
यावर्षी पावसाळ्याचा जून महिना कोरडा गेल्यामुळे तालुक्याला बारवी धरणातून पाणी पुरवठा करावा लागला होता. रानसई धरणाची उंची १२० फूट असली तरी धरणाची पाण्याची पातळी ११६.६ फूट एवढी झाली की धरण ओसंडून वाहते. अर्ध्या अधिक तालुक्याची तहान रानसई धरण भागवते. या धरणातून सध्या नगर परिषद, २१ गावे आणि एनएडी, ओएनजीसी, जीटीपीएस व इतर प्रकल्पांना पाणी पुरवठा केला जातो. यंदा एप्रिल अखेरीस या धरणाच्या पाण्याने तळ गाठला होता. कधी नव्हे ते मृत साठ्यातून पाणी उपसावे लागले होते. त्यामुळे एमआयडीसीने आठवड्यातून दोन दिवसांची पाणी कपात सुरू केली होती. आता धरण भरल्यामुळे तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. लवकरच पाणी कपात बंद करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीचे उप अभियंता चौधरी यांनी दिली.