मुंबई – राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुबंईत येणार असून भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदरांसोबत त्यांची बैठक होणार आहे. मात्र त्यांचा ठाकरेंशी त्यांच्या कोणताही कार्यक्रम ठरला नसल्याची माहिती मिळत आहे. यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी ‘त्या मातोश्रीवर येण्यासाठी आम्ही पाठिंबा दिलेला नाही’, असे स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘आदिवासी महिला सर्वोच्च स्थानी जात असल्याने आमचा त्यांना पाठिंबा आहे. आमचा निर्णय राजकारणापलिकडचा आहे. त्यांना पाठिंबा देण्यामागे कोणतीही राजकीय भावना नाही. राजकीय गणित नाही. सेनेने याआधीही प्रतिभाताई पाटील मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे. तसेच आम्ही एनडीएचा भाग नाही’, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ‘राज्याच्या पुरात १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर सरकारचे लक्ष नाही. शपथ घेतली म्हणजे सरकार अस्तित्वात असे होत नाही. महाराष्ट्र वाऱ्यावर आहे. मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. अधिकारी जागेवर नाहीत’, अशी टीका शिंदे गटावर करत ‘राज्यपाल आता कुठे आहेत?’, असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला.