नवी दिल्ली – देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून आदिवासी समाजाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीच्या दोन फेर्या पूर्ण झाल्या नंतर एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 1349 मते मिळाली होती. ज्यांचे एकूण मूल्य 4 लाख 83 हजार 299 आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना आतापर्यंत 537 मते मिळाली असून त्यांची एकूण किंमत 1 लाख 79 हजार 876 इतकी आहे.
निवडणूक अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजता खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण झाली. यामध्ये द्रौपदी मुर्मू यांना 540 तर यशवंत सिन्हा यांना 208 खासदारांची मते मिळाली. 15 मते रद्द झाली. म्हणजेच मतमोजणीनुसार खासदार आणि 10 राज्यांतील 1886 मतांची मोजणी पूर्ण होऊन त्यांची किंमत 6 लाख 73 हजार 175 इतकी आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आहेत. मतमोजणी सुरू असतानाच द्रौपदी मुर्मूंच्या गावात विजयी जल्लोष सुरू झाला होता.