नवी दिल्ली – नॅशनल हेराल्ड प्रकरणात आज सलग पाचव्यांदा कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली. रात्री उशिरापर्यर्ंत राहुल गांधी यांची ईडी चौकशी सुरू होती. काल तब्बल 10 तास राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून आतापर्यर्ंत राहुल गांधी यांची 35 तास चौकशी करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सलग तीन दिवस ईडीच्या अधिकार्यांनी राहुल गांधींची चौकशी केली. त्यादरम्यान मनीलाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांचे जबाब नोंदविण्यात आले होते.
राहुल गांधी यांची एकीकडे ईडीकडून चौकशी करण्यात येत होती तर दुसरीकडे कॉँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेेंद्र बघेलही सहभागी झाले होते. राजस्थान येथेही राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी सीकर येथे कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी सालासर बस स्टॉप येथे एकत्र येत पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पुतळा जाळला. यावेळी बोलताना काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गिठाला म्हणाल्या की, मोदी सरकार आल्यापासून देशात महागाई सातत्याने वाढत आहे.