मुंबई – कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्यानंतर देशभरात कॉँग्रेस कार्यकर्तेे आक्रमक झाले आहेत. आज राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ मुंबईत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हॅँगिंग गार्डन ते राजभवन असा जोरदार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नेते, मंत्री आणि कार्यकर्तेे सहभागी झाले होते. हा मोर्चा राजभवनवर धडकण्याआधीच पोलिसांनी तो रोखला. त्यामुळे कॉँग्रेस कार्यकर्तेे आक्रमक झाले होते. त्यांनी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्स हटविण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी कॉँग्रेसचे मंत्री, पदाधिकारी यांना ताब्यात घेत आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले होते.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राजकीय द्वेषातून भाजपा सरकार करत असलेल्या कारवाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरलेली असताना पोलीस बळाचा वापर करून मंत्री, खासदार आमदार, महिला कार्यकर्ते यांना मारहाण केली जात आहे. देशात आज अराजकता निर्माण केली आहे. याविरोधातील असंतोष व्यक्त केला जात आहे.