नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड गैरव्यवहारप्रकरणी चौकशी होणार आहे. सक्तवसुली संचनालयाने (ईडी) याबाबत त्यांना बुधवारी, १ जून रोजी नोटीस बजावून ८ जूनला कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज, ३ जून रोजी पुन्हा एकदा राहुल गांधींना नोटीस बजावून ईडीने १३ जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. पहिल्या नोटिशीला उत्तर देताना राहुल यांनी आपण परदेशात असल्याने ५ जूननंतरची तारीख देण्याची विनंती ईडीला केली होती. त्या अनुषंगाने ईडीने त्यांना १३ जूनला हजर राहण्यासाठी नवी नोटीस पाठवली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांचीही चौकशी होणार आहे. त्यांना ईडीने ८ जून रोजी बोलावले आहे. मात्र, काल त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात कधी हजर राहणार, याबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. तर, काँग्रेस पक्षाच्या म्हणण्यानुसार, ‘जर सोनिया बऱ्या झाल्या तर त्या नक्कीच चौकशीला उपस्थित राहतील.’ महत्त्वाचे म्हणजे सोनियांनंतर आता प्रियांका गांधींनाही कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, नॅशनल हेराल्डचा मुद्दा २०१२ मध्ये चर्चेत आला. त्यानंतर भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की, काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यंग इंडियन लिमिटेडमार्फत विकत घेतले. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसची २००० कोटी रुपयांची इमारत ताब्यात घेण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामींनी केला होता. नुकतेच या प्रकरणात १२ एप्रिल रोजी काँग्रेस नेते पवन बन्सल यांची ईडीने चौकशी केली होती. तर आता थेट सोनिया गांधींना नोटीस बजावण्यात आल्याने या प्रकरणावरून राष्ट्रीय स्तरावरील राजकारण तापण्याची चिन्ह दिसत आहेत.