अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील रेल्वे क्रॉसिंगवर मालखेडहून येणारी एसटी महामंडळाची बस बंद पडल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. यावेळी, प्रवाशांनी खाली उतरून बस ढकलून पाहिली, पण ती इंचभरही पुढे सरकली नाही. यावेळेस पुणे-काझिपेट एक्स्प्रेसची वेळ झाली होती त्यामुळे फाटकावरील रेल्वे कर्मचा-यांची तगमग वाढली. अखेरीस पुणे-काझिपेट एक्स्प्रेस ही फाटकाजवळच थांबवण्यात आली आणि दुसरी एसटी बस बोलावून दोरीच्या सहाय्याने बंद पडलेली बस रेल्वे रुळांवरून हटविण्यात यश मिळाले. या प्रकारामुळे एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले होते.