भुवनेश्वर – एटीएममधून नोटा काढता येतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र ओडिशामध्ये लवकरच एटीएममधून धान्यही मिळणार आहे. रेशन डेपोवरील एटीएममधून धान्य देण्याची व्यवस्था राज्य सरकार लवकरच करणार आहे. त्याला ‘ग्रेन एटीएम’ असे म्हटले जाईल. या योजनेअंतर्गत भुवनेश्वरमध्ये पहिले धान्य एटीएम बसवण्यात येणार आहे.
अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री एटानु यांनी ओडिशा विधानसभेत या योजनेची माहिती दिली. ते म्हणाले, ओडिशातील नागरिकांना धान्य एटीएममधून रेशन देण्याची तयारी केली जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शहरी भागात धान्याचे एटीएम बसवले जातील. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे विशेष एटीएम बसविण्याची योजना आहे. एटीएममधून रेशन घेण्यासाठी संबंधितांना विशेष कोड असलेले कार्ड दिले जाईल. ग्रेन एटीएम मशीन पूर्णपणे टच स्क्रीन असेल. त्यात बायोमेट्रिक सुविधा असणार आहे. दरम्यान, धान्य मिळविण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक आणि रेशन कार्डवर नमूद केलेला क्रमांक धान्य एटीएममध्ये टाकावा लागेल. त्यानंतर एटीएममधून धान्य मिळेल.