शिमला- हिमाचल प्रदेशात एका परवानू रोपवे मध्ये 11 प्रवासी अडकून पडल्याची घटना समोर आली होती. तांत्रिक बिघाडामुळे रोपवे मध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले होते. एका ट्रॉलीच्या माध्यमातून जवानांना सर्व 11 पर्यटकांना वाचवण्यात यश आले. यात 5 कुटुंबातील 10 लोक रोपवेत अडकले होते. तर एक व्यक्ती कोलकाता येथील रहिवासी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या घटनेला दुजोरा देताना एसपी सोलन वीरेंद्र शर्मा यांनी सांगितले की, परवानूच्या टीटीआरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे रोपवे दीडच्या सुमारास मध्यभागी अडकला होता. तर रोपवे मध्ये अडकलेल्या पर्यटकांनी सांगितले की, ते रिसॉर्टमध्ये जात होते. तांत्रिक बिघाडामुळे येथे लाकडाचा ट्रेल अडकला. या सर्व प्रवाशांना रेस्क्यू ट्रॉलीच्या माध्यमातून खाली आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी झारखंडमधील देवघर येथील त्रिकूटजवळ झालेल्या रोपवेच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. यातील इतर पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कर, हवाई दल, एनडीआरएफ, इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने तब्बल 46 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर यातील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले होते. हा अपघातदेखील तांत्रिक बिघाडामुळे घडला होता. त्यानंतर आता हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा तशाच प्रकारची घटना घडल्याने अशा प्रकारच्या रोपवे मधून प्रवास करणे धोक्याचे ठरू लागले आहे.