लंडन – भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार रोहित शर्मा याला कोरोनाची लागण झाली आहे. एजबॅस्टन येथे १ जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारताला हा मोठा धक्का मानला जात आहे. रोहित सध्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिलेल्या माहितीनुसार, ‘इंग्लंडमधील लीसेस्टर येथे रॅपिड अँटीजेन चाचणीत रोहितला कोरोना झाल्याचे आढळून आले. शनिवारी, २५ जून रोजी त्याची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीअंतर्गत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. लीसेस्टरशायर विरुद्धच्या सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितची तब्येत बिघडली होती, ज्यावेळी पहिल्या डावात त्याने २५ धावा केल्या होत्या.’
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी भारत लीसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसीय दौरा सामना खेळत आहे. भारत सध्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. गेल्या वर्षी भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला होता, मात्र चार सामन्यांनंतर भारताचे काही खेळाडू आणि प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. अशा स्थितीत भारताने चार कसोटीनंतर पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिला होता. आता पाचव्या कसोटीत विजयी झाल्यास किंवा कसोटी अनिर्णित राहिल्यास भारताला २००७-०८ नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये मालिका जिंकता येणार आहे. दरम्यान, रोहितच्या अगोदर भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो इतर खेळाडूंसोबत लंडनला गेला नव्हता. परंतु आता तो बरा आहे. तसेच वृत्तांनुसार, गेल्या आठवड्यात लंडनमध्ये दाखल झालेल्या विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता तोही बरा आहे.