नवी दिल्ली- पुढच्या आठवड्यात नाही, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी एक वाजता नवी दिल्लीत पोहोचले. शिंदेंची ही सहावी दिल्ली वारी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीपासूनच दिल्लीत आहेत. दोन्ही नेत्यांचा दोन दिवसांचा दिल्ली दौरा आहे. त्यामुळे दिल्लीत आज आणि उद्या होणार्या राजकीय घडामोडींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.
काही शासकीय कामांसाठी या दोघां नेत्यांचा हा दिल्ली दौरा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आज आणि उद्या हे दोन्ही नेते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकांमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम चर्चा करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यानंतर सोमवारी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करण्यात येईल, असेही म्हटले जात आहे. शिंदे-भाजप सरकार अस्तित्वात येऊन एक महिना उलटून गेला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. विकासकामं प्रलंबित आहेत. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्तार न होणं हे अयोग्य असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. शिंदे सरकारची खिल्लीही उडवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराअभावी पावसाळी अधिवेशनही होत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आता महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ स्थापन होणं आवश्यक आहे. आज आणि उद्या नवी दिल्लीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल दाखल होत आहेत. आज दुपारी साडे चार वाजता पंतप्रधानांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक राष्ट्रपती भवनात झाली. तसेच उद्या नीती आयोगाची देखील बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिंदे आणि फडणवीसांसह महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे या बैठकीला हजर राहतील.