मुंबई- लाखो गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाचा आज पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लालबागच्या राजाच्या पाद्यपूजनानंतर खर्या अर्थाने मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे.
यंदा लालबागच्या राजाचे 89 वे वर्ष आहे. आज शनिवारी सकाळी 11 वाजता लालबाग राजा गणेश पूजन (पाद्यपूजन) संपन्न झाले. हनुमान मंदिर, लालबागचा राजा मार्ग, श्री गणेश नगर, लालबाग, मुंबई येथे हा सोहळा ढोल ताशांच्या गजरात मोठ्या मांगल्यमय वातावरणात पार पडला. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते लालबागच्या राजाचे पाद्यपूजन करण्यात आले. लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याला दरवर्षीच गणेश भक्त हजेरी लावतात. आजही अनेक भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या पाद्यपूजनाला हजेरी लावली होती.