मुंबई – मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे रक्तदानाच्या पवित्र कार्यात गेले अनेक वर्ष आपले योगदान देत आहे. त्या कार्याचीच एक कौतुकाची थाप महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या विद्यमाने मंडळाला मिळाली आणि राज्य रक्तदाता गौरव सन्मान २०२२ हा मानाचा पुरस्कार देऊन लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सन्मानित केले.
जागतिक रक्तदाता दिनाचे मंगलमय औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते मंडळाचे उपाध्यक्ष सागर गुप्ता व कार्यकारिणी सदस्य निलेश महामुणकर यांनी मंडळाच्या वतीने हा सन्मान स्विकारला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेंद्र यड्रावकर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य आयुक्त डाॅ. प्रदीप व्यास, आयुक्त डाॅ. रामास्वामी, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डाॅ. श्री. अरुण थोरात, डाॅ. श्रीमती साधना तायडे ऊपस्थित होते.