नवी दिल्ली – आज काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी सलग तिसर्या दिवशीही जीएसटी, महागाई, अग्निपथ योजना, बेरोजगारीवरुन लोकसभा आणि राज्यसभा सभागृहात धोषणाबाजी करत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळामुळे 2 वाजेपर्यंत दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आले. तसेच आज लोकसभा आणि राज्यसभा सुरु होण्याआधी संसद परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळाजवळ काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खडगे आणि अधीर रंजन चौधरी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन जोरदार निदर्शन करत आपली नाराजी वयक्त केली.
लोकसभेतील झालेल्या गोंधळादरम्यान लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, लोकसभेचा सभागृह चर्चेसाठी आहे. त्यासाठी प्रश्नकाळनंतर शूनयकाळमध्ये वेळ दिला जाईल. सभागृह हे घोषणाबाजीसाठी नाही. गोंधळ घालून लोकसभेचे पावित्र तुम्ही कमी करत आहात. लोकसभेच्या सभागृहात गोंधळ घालणे हे देशाच्या लोकशाहीसाठी चांगले नसल्याचे बिर्ला यांनी गोंधळी खासदारांना सांगितले. मात्र बिर्लांच्या म्हणण्याकडे या खासदारांनी दुर्लक्ष करत जोरदार धोषणाबाजी गोंधळ घातला. त्यानंतर बिर्ला यांंनी सभागृह दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केली, अशीच परिस्थिती राज्यसभेची होती.