वर्धा – वर्धा जिल्ह्यात काल दुपारपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते.जोरदार पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.तर दोघेजण नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे समोर आले आहे.तसेच पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.अवघ्या तीन तास सलगपणे कोसळलेल्या या पावसाने प्रचंड दाणादाण उडाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.देवळी तालुक्यातील पुलगाव येथील रामटेक लेआउटमध्ये सुमन अरुणराव गजामे (६२) ही महिला नाल्याच्या पुरात वाहून गेली.तर देवळी तालुक्यातील पिपरी खराबे येथील देवानंद किनाके हे जनावरे चरायला घेऊन गेले असताना नाल्याच्या पुरात वाहून गेले.तसेच हिंगणघाट नांदगाव येथे शेतात काम करताना वीज कोसळल्याने गीता मेश्राम (३६) या महिलेचा मृत्यू झाला.तर वर्धा तालुक्यातील कुरझडी येथील श्रीराम यांचाही वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झाला.त्याचप्रमाणे पुलगाव रोडवरील धोत्रा नदीला पूर आल्याने दहा मजूर अडकले होते.त्यांची कशीबशी स्थानिकाच्या मदतीने सुटका करण्यात आली.