वर्धा – शुक्रवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने तालुक्यातील लहान आर्वी, नवीन आष्टी, साहूर, धाडी गावात पाणी शिरले होते.
आष्टी येथे लेंडी नाल्याला पूर आल्याने २० कुटुंबांना हुतात्मा स्मारक समिती, आष्टीच्या वसतिगृहात हलविण्यात आले. तसेच कारंजा तालुक्यातील जवळपास सर्वच छोट्या-मोठ्या नाल्यांना पूर आल्यामुळे सावरडोह, बेलगाव, सुसुंद्रा, खापरी, ढगा या गावांचा संपर्क तुटला. तसेच आर्वी तालुक्यातील मदन प्रकल्प १०० टक्के भरले असून धरणात होणारी पाण्याची आवक पाहता विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाघाडी नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, वर्धा प्रकल्पाचे १९ दरवाजे रात्री १ वाजता ५० सेमीने उघडण्यात आले. प्रकल्पातून ८२७ घन.मी विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडल्याने आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी पुलावरून पाणी वाहिल्याने येथील वाहतूक ठप्प झाली.
दरम्यान, आष्टी तालुक्यासह दोन दिवसांपूर्वी पुराचा फटका बसलेल्या हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे येथील नागरिक अद्यापही भीतीच्या सावटात आहेत.