कोल्हापूर- शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने संपूर्ण देशाला आदर्श घालून देणारा विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारनेही त्याची दखल घेऊन राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी असा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. पन्हाळा तालुक्यातील वाघवे ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतानाच त्याची अंमलबजावणी करणाऱ्या कुटुंबाला एक वर्ष घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा केली. सरपंच प्रदीप पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूरच्या हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने आदेश काढून असे निर्णय सर्व ग्रामपंचायतींनी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सांगलीतील काही गावांनी असे निर्णय घेतले. कोल्हापूरच्या हेरवाड, माणगावनंतर पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावाने विधवा प्रथा बंदीबरोबरच या निर्णयाची अंमलबजावणी करणाऱ्या गावातील कुटुंबाला एक वर्ष पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ करण्याचाही निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे ते पहिलेच गाव ठरले आहे. ग्रामपंचायतीने एक मताने हा ठराव मंजूर केला, असे सरपंच प्रदीप पाटील यांनी सांगितले.