मुंबई – राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची धामधूम आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
भाजपाने आतापर्यंत आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली आहे आणि आज सहाव्या जागेसाठी उमेदवार देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तर, शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी दोघांना उमेदवारी दिली आहे. परंतु उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असूनही राष्ट्रवादीने मात्र कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही.
राष्ट्रवादीच्या गोटातून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा होती. दोन्ही नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. मात्र पक्षाकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाहीत. अशातच शरद पवार रात्रीच पुण्यात दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.