मुंबई – येत्या 10 जून रोजी होणार्या राज्यसभेच्या निवडणुकीमुळे भाजप आणि महाविकास आघाडीतील राजकारण तापले असताना आता विधानपरिषद निवडणुकीच्या प्रक्रियेत महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी भाजप 5 उमेदवार देणार आहे. त्यासाठी भाजपने आपल्या हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपकडून विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित 3 जागांसाठी भाजप उमेदवारांची नाव जाहीर करण्याची शक्यता आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी 20 जून रोजी मतदान पार पडणार आहे. उर्वरित तीन जागांसाठी चित्रा वाघ, श्रीकांत भारतीय, पंकजा मुंडे, राम शिंदे, सदाभाऊ खोत, कृपाशंकर सिंह यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. पाचव्या जागेसाठी राम शिंदे किंवा कृपाशंकर सिंह यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. महाराष्ट्र भाजपच्या वतीने या नावांची यादी दिल्लीत पाठवली आहे. याआधीच राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने सातवा उमेदवार देऊन महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवलें आहे. त्यातच आता विधान परिषद निवडणुकीतही भाजपकडून पाच उमेदवार देणार असल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.