मुंबई- विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटली अशी माहिती समोर आली आहे. आता या फुटलेल्या आमदारांवर कारवाई होणार आहे. काँग्रेसने २० जूनला पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी दिली होती. हंडोरे यांना केवळ २२ मते पडली. ७ जणांनी भाजपला मतदान केल्याने हंडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटीलयांच्याकडे या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
नव्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेसचे काही आमदार गैरहजर होते. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यावर सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. काँग्रेसचे नेते या ठिकाणी उशिरा पोहोचल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करताना महाविकास आघाडीची केवळ ९९ मते मिळाली होती. महाविकास आघाडी सरकारला १०० मते न मिळाल्याने अनेकांनी काँग्रेसचे प्रमुख नेत्यांवर संशय व्यक्त केला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गैरहजर राहणाऱ्या नेत्यांमध्ये अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांचाही समावेश होता. काँग्रेसचे हायकंमाड नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.