पालघर – गेल्या दोन दिवसांपासून पालघर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैतरणा नदीच्या प्रवाहाने रौद्ररूप धारण केले आहे. अशातच मुंबई-बडोदा महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असताना अचानक या नदीला पूर आल्याने पुरात १० कामगार अडकून पडले होते. तब्बल १८ तासांनंतर आज सकाळी एनडीआरएफच्या जवानांनी या सर्व कामगारांची सुखरुप सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नदी पात्राच्या मध्यभागी पिलर उभा करण्यासाठी बार्जवर कामगार तैनात करण्यात आले होते. बुधवारी दुपारी या नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाल्याने नदी पात्राच्या मध्यभागी असलेल्या बार्जचा नांगर तुटला आणि बार्ज नदी पात्रात हेलकावे खाऊ लागला. या बार्जवर अडकलेल्या कामगारांनी जीव मुठीत घेऊन मदतीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने एनडीआरएफच्या पथकाला याबाबत माहिती दिली. मग एनडीआरएफच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून १८ तासांनंतर या १० कामगारांची सुखरुप सुटका केली. रात्रीच्या अंधारात बचावकार्यात अडथळे आल्याने काहीवेळ हे काम थांबविण्यात आले. मग सकाळी लवकर पुन्हा बचावमोहीम सुरू करण्यात आली होती.
मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गासाठी दहिसर आणि बहाडोली गावादरम्यान वैतरणा नदी पात्रात पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी जी आर इन्फ्रा कंपनीच्या वतीने बार्ज तैनात करण्यात आला आहे. नदी पात्राच्या मध्यभागी पिलर उभा करण्यासाठी बार्जवर कामगार तैनात आहेत. दरम्यान, वैतरणा नदीच्या उपनद्यांवरील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वैतरणा नदी पात्राच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.