नागपूर- देशातील व्याघ्र गणनेची आकडेवारी जाहीर करण्याचा जागतिक व्याघ्र दिनाचा मुहूर्त यंदा प्रथमच हुकला. २९ जुलैला जागतिक व्याघ्रदिनी ही आकडेवारी जाहीर होणार नाही. व्याघ्रदिनी वाघांची आकडेवारी जाहीर करण्याची ही परंपरा यंदा पहिल्यांदाच खंडित झाली. त्यामुळे वन्यजीव प्रेमींचा हिरमोड झाला.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण देशातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील वाघांची वैज्ञानिक पद्धतीने गणना करते. त्यासाठी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेची मदत घेतली जाते. २०१८ मध्ये देशातील वाघांची शेवटची गणना झाली होती. त्यावेळी भारतात २ हजार ९६७ वाघ होते. सेंट पीटर्सबर्ग येथे २०१० साली आयोजित केलेल्या जागतिक व्याघ्र शिखर परिषदेत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प भारताने जाहीर केला होता. मात्र २०२२ मधील व्याघ्र गणना पूर्ण झालेली नाही. त्यामुळे जागतिक व्याघ्र दिनी देशातील वाघांची संख्या जाहीर होणार नाही. २९ जुलैला चंद्रपूर येथील वन अकादमीत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे उपस्थित राहणार आहेत. सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत जागतिक व्याघ्र दिनाचा हा कार्यक्रम होणार आहे.