सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्लाबोल आंदोलन केल्याप्रकरणी अटक झालेल्या कराड आगारातील पहिल्या महिला कंडक्टरचे राहत्या घरी निधन झाले आहे. कराड तालुक्यातील येवती येथील सुषमा नारकर असे त्यांचे नाव असून त्यांना आंदोलनात अटक केल्यानंतर आठ दिवस पोलीस कोठडीत राहावे लागले होते. 8 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर सुषमा नारकर यांना 8 दिवस तुरुंगात काढावे लागले होते. कारण त्या त्यावेळी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आठ दिवसांनंतर नारकर यांना जामीन मिळाल्यापासून त्या घरीच होत्या. कारण घरी आल्यावर सुषमा या आजारी पडल्या होत्या. या आजारपणातच काल बुधवारी त्यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण कराड एसटी आगारावर शोककळा पसरली आहे. 2000 साली सुषमा नारकर यांची कराड आगारातील पहिल्या महिला कंडक्टर म्हणून भरती झाली होती.
गेली 22 वर्षे त्यांनी या आगारात आपली सेवा बजावली आहे. एसटी महामंडळ विलीनीकरण मागणीसाठी झालेल्या मुंबईतील आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. तसेच शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर झालेल्या हल्लाप्रकरणात सहभागी झाल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली होती.