मुंबई – ‘बरोबर २० मेला मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी शिंदे साहेबांना वर्षावर बोलवून घेतलं आणि त्यांना थेट विचारलेलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का, ही घ्या चावी तुम्ही आजपासून बना. तेव्हा नाटक केलं, रडगाणं झालं की असं होतंय, तसं होतंय, इथून त्रास आहे, तिथून त्रास आहे. ही फाईल उघडलेली आहे, इथून असं झालेलं आहे’, असा गौप्यस्फोट आज राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. सांताक्रुझमध्ये युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य ठाकरे बोलत होते.
ते म्हणाले, ‘आता आपल्यात किती राहिले? मी खूपवेळा मागे वळून बघतो, पद असलेले आमदार कमी दिसतात, जास्त चॅनेलवर दिसतात पण तिथे पण मला माहितीये, तिथे जे गेलेले आहेत त्यातले १५-१६ लोक हे आपल्यासोबत आहेत, आपल्या संपर्कात आहेत आणि त्यांना फरपटून नेलेलं आहे, असं मला सांगण्यात आलं. पण जे फुटीरवादी आहेत त्यांना माफी नाही, क्षमा नाही.’
पुढे ते म्हणाले, ‘काल तर एक भयानक व्हिडीओ फिरत होता. कसा तो व्हिडीओ होता. म्हणजे काय परिस्थिती करून ठेवली आहे. काय मान होता, काय सन्मान होता. शिवसेनेत नंबर २ सारखे वागत होते. काही आमदार, मंत्री सोबत गेलेले आहेत पण इथे जो मान-सन्मान मिळत होता, जे प्रेम या शिवसैनिकांचं मिळत होतं, महिलागट आणि पुरुषांचं मिळत होतं, युवासेनेचं मिळत होतं, माझ्या भारतीय कामगार सेनेचं मिळत होतं. एवढंच नाही, मी आता स्कॉटलंडला गेलो होतो. तिथे ठाकरे सरकारचं कौतुक चाललेलं, धारावी मॉडेल असेल, मुंबई मॉडेल असेल, वरळी मॉडेल असेल, महाराष्ट्र मॉडेल असेल, प्रत्येकजण आपल्या महाविकास आघाडीचं आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत होते. आता ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी पण दरवाजे खुले आहेत आणि ज्यांना यायचंय त्यांच्यासाठीही दरवाजे खुले आहेत पण कोणासाठी, तर त्यांच्यातले जे चांगले आहेत जे आपल्यातले आहेत, जे अजूनही आपल्याशी मनाने, हृदयाने जुळलेले आहेत त्यांच्यासाठी आहेत. जे स्वतःला विकून गेले आणि दुसऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी दरवाजे कदापि खुले नाही आहेत. फक्त शिवसेनेचे म्हणत नाही मी महाराष्ट्राचे दरवाजे बंद झालेले आहेत.’
‘सुरतवरून गुवाहाटीला जातानाचे व्हिडीओ पाहा तुम्ही. प्रत्येक आमदाराला मान पकडलेली आहे, हात पकडलेले आहेत, एका विमानातून दुसरीकडे अक्षरश: कैद्यांसारखे फरपटत नेताहेत. ज्याला आवाज नाही ज्याला ताकद नाही त्याला ताकद देणं ही शिवसेनेची ओळख आहे. असं काम आपण करून दाखवलेलं आहे पण आपण कुठून आलो, कुठे पोहोचलो, कोणी दिलं, कोण माझ्यासोबत होतं, हा सगळा विचार ते करायला लागले तर मला खात्री आहे की त्यांना पण स्वतःला आरशात बघायला लाज वाटेल. अशी त्यांची परिस्थिती आज झालेली आहे. आपण राज्यसभेसाठी संजय राऊत, जी आपली तोफ आहे, त्यांना एक तिकीट दिलं आणि दुसरं तिकीट आपण आपले संजय पवार जे कोल्हापुरातले सर्वसाधारण कार्यकर्ते आहेत त्यांना दिलं. एवढे वर्ष आपल्यासाठी लढत आले त्यांना तिकीट दिलं आणि त्यांना पाडायचं काम या फुटीरवादी आपल्या आमदारांनी केलेलं आहे. उद्धव साहेबांचं प्रत्येकावर लक्ष असतं, प्रत्येकावर प्रेम असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास असतो. आपण कधीकधी आपला अंधविश्वास सर्वांवर टाकून पुढे निघतो. आम्ही आता चर्चा करत आहोत की नक्की चुकलं काय, यांना कमी दिलं काय. मग मध्येच कोणी बोलून जातं की, साहेब तुम्ही जास्त विश्वास टाकला, तुम्ही अंधविश्वास टाकला. मग परत साहेब बोलतात की, शिवसैनिकावर विश्वास टाकायचा नाही मग कोणावर टाकायचा विश्वास? ही परिस्थिती अशी आहे. बरं बंड करायचाय ना, तर चला हिंमत दाखवून करा. खूप बंड असे होत असतात जे विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षांमध्ये जायला होत असतात. हा पहिला असा बंड आहे सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात बसण्यासाठी. परंतु प्रत्येक आमदार तिथे गेला तरी विजय हा शिवसेनेचाच होणार. उद्धव साहेबांनी मोह सोडलाय, जिद्द नाही, ताकद नाही. फुटीरवाद्यांनी पक्ष सोडलेला असेल किंवा नसेल पण माझ्या शिवसैनिकांनी नाही. काय म्हणतात तर, आमचाच धनुष्यबाण, आमचीच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, अहो ते नाव घेण्याची लायकी असती तुमची तर बंड करायला सुरतमध्ये पळाला असतात? महाराष्ट्रात थांबायची हिंमत नाही म्हणून सुरतेत पळाले तिथून गुवाहाटीत. काय होतात तुम्ही आणि काय जोक झालाय तुमचा. जिथे पूर आलेला आहे, लाखो लोकांना खायला अन्न नाही, घर नाही तिथे मजा करायला गेलात तुम्ही. तिथे खाण्या-पिण्याचे आठ-आठ, नऊ-नऊ लाख बिल आहेत यांचे. चार्टर्ड प्लेनचा खर्च किती असेल? किडनॅपिंगसारखे घेऊन गेले त्यांना कपडे देण्याचा बिल किती असेल?’, बंडखोर आमदारांवर असे टीकास्त्र सोडत आदित्य ठाकरेंनी त्यांना यावेळी आवाहन केले ‘समोर या, राजीनामे द्या आणि निवडणूक लढवा प्रत्येकाला पाडल्याशिवाय राहणार नाही.’