मुंबई – शिवसेनेला मोठे भगदाड पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकार्यांसोबत बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे आमदारांनंतर आता खासदारही बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता कार्यकर्तेही दोन गटांत विभागले गेले आहेत. यातूनच आज दादर-माहिम विधानसभा मतदारसंघात पक्षाचे विचार आणि बॅनर लावण्यावरून माजी नगरसेवक आणि शाखाप्रमुखात राडा झाल्याचे समोर आले आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक मिलिंद वैद्य आणि शाखाप्रमुख मिलिंद तांडेल याच्यात हा राडा झाला. दादर-माहिम या मतदारसंघाचे सदा सरवणकर हे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सदा सरवणकरही त्यांच्या गटात सामील झाले होते. माहिम येथील शाखाप्रमुख मिलिंद तांडेल हे सदा सरवणकर यांचे समर्थक आहेत. तर माजी नगरसेवक मिलिंद वैद्य हे उद्धव ठाकरे यांचे समर्थक आहेत. आज सायंकाळी दादर येथे तांडेल आणि वैद्य यांच्यात बॅनर लावण्यावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. अखेरीस कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला.