मुंबई- राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतीचे भरपूर नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. या अडचणीच्या प्रसंगी मुख्यमंत्री ठिकठिकाणी सत्कार स्वीकारण्यास व्यस्त आहेत, हे सरकार संवेदनशील नाही अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकताच पूरग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यानंतर मुंबईत अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
राज्यात ज्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे, तेथे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे. अद्याप नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे झालेले नाहीत. सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी रु.75 हजार मदत द्यावी, तसेच फळपिकांसाठी हेक्टरी रु.1 लाख 50 हजार तात्काळ मदत करावी. तसेच अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता सरसकट शैक्षणिक शुल्क माफ करावे. राज्यात काही दिवसांपू्र्वी कोसळलेल्या पावसामुळे अनेक शेतकर्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. अतिवृष्टीमध्ये घरांची पडझड होऊन काही ठिकाणी घरे वाहून गेली आहेत. त्यामुळे अंशतः पडलेल्या घरांना व पूर्ण वाहून गेलेल्या घरांना त्वरीत मदत आवश्यक आहे. बर्याच घरामध्ये काही दिवस पाणी होते व हे पाणी ओसरल्यानंतर ओलाव्यामुळे सुध्दा बर्याच घरांची पडझड होऊन नुकसान होऊ शकते. तरी यांनाही मदत मिळणे आवश्यक आहे. त्यांचे पंचनामे त्वरीत होणेसाठी कार्यवाही व्हावी. क्षेत्रीय स्तरावर तात्काळ याबाबत सुचना द्याव्यात असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. याप्रसंगी अजित पवार यांनी राज्याच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले. ते म्हणतात की, फडणवीस- शिंदे सरकारला एक महिना झाला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असतानाही विलंब का होत आहे? मंत्रिमंडळ विस्तारासाठी कुणाची वाट पाहताय?असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे.