कोल्हापूर- प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीवरून शिक्षक संघटनांत बंडखोरी झाली. काही अपक्ष म्हणून तर काहींनी पुरोगामी पॅनेलमधून आपली उमेदवारी कायम ठेवली. शिक्षक समितीचे जिल्हा नेते कृष्णात कारंडे यांनी बंडखोरी करून करवीर सर्वसाधारण गटातून उमेदवारी कायम ठेवून अपक्ष म्हणून रिंगणात राहिले.
समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष रवळू पाटील यांनी गडहिंग्लज तालुक्यातून, जिल्हा उपाध्यक्ष विष्णू जाधव यांनी गगनबावडा येथून, तर जिल्हा उपाध्यक्ष विनायक चौगुले यांनी भुदरगड तालुक्यातून बंडखोरी केली. या तिघांनीही पुरोगामी परिवर्तन पॅनलमधून उमेदवारी स्वीकारली. याशिवाय अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयवंत पाटील यांना हातकणंगले तालुक्यातून, तर शिक्षक सेना शिरोळ तालुका अध्यक्ष मनोज रणदिवे यांना इतर मागास गटातून, थोरात गट शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, माजी संचालक सुरेश कांबळे यांनी अनुसूचित जाती गटातून पुरोगामी परिवर्तन पॅनेलमधून उमेदवारी स्वीकारली. थोरात गट शिक्षक संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा व बँकेच्या विद्यमान संचालिका लक्ष्मी पाटील यांनीही बंडखोरी करून महिला गटातून उमेदवारी कायम ठेवली. या निवडणुकीत शिक्षक समिती व थोरात गट शिक्षक संघ यांच्यात बंडखोरी झाली. त्यामुळे पुरोगामी पॅनेलला सक्षम उमेदवार मिळाले. सत्ताधारी वरुटे गटाने आजी-माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज भरले नव्हते. त्यांनी नव्या चेहर्यांना संधी दिली आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पॅनेलची रचना केल्याने सत्तारूढ पॅनेल एकसंघ राहिल्याचे पॅनेलचे नेते राजाराम वरुटे यांनी सांगितले.