मुंबई – शिवसेनेला आणखीन धक्का बसला आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राजीनामा पाठवला आहे. याआधी कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते.तीन वर्ष तोंड दाबून लाथाबुक्क्यांचा मार खाल्ला असे धक्कदायक विधान केलेले सनसनाटी पत्र रामदास कदम यांचं उद्धव ठाकरेंना पाठवले आहे
रामदास कदम आपल्या पत्रात म्हटले आहे की, सन्माननीय उध्दवजी ठाकरे,यांसी जय महाराष्ट्र ! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही, हे मला पहायला मिळालं.आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले. विधानसभेच्या निवडणूकीच्या आधी आपण मला आचानक मातोश्रीत बोलवून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही, यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करित आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे. २०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवत होतात. त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत संघर्ष केला आणि हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती करु नका. ती बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होईल, अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही, याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेनाप्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे.
रामदास कदम शिवसेनेतील दुसऱ्या फळीतील नेते होते. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर कोकणातील आक्रमक चेहरा म्हणून शिवसेनेनं त्यांची विरोधी पक्षनेते पदी नेमणूक केली होती. २०१४ साली राज्यात आलेल्या भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये त्यांच्याकडं पर्यावरण खात्याची जबाबदारी होती. शिवसेनेच्या कोट्यातून ते विधान परिषदेवर आमदार होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये मात्र त्यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळं ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात रामदास कदम यांनीच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना माहिती पुरवली होती, असा आरोप त्यांच्यावर होता. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनीही त्यांना दूरच ठेवलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेनेच्या बैठकांनाही उपस्थित राहत नव्हते. प्रकृतीच्या कारणास्तव दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचंही त्यांनी टाळलं होतं. विधान परिषदेत समारोपाचं भाषण करताना त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेनेत राहणार असं म्हटलं होतं. मात्र, आज नेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळं त्यांच्या पुढील वाटचालीबाबत वेगवेगळे अंदाज बाधंले जात आहेत.