मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मविआची व्यूहरचना झाली असून आज सायंकाळी शिवसेनेच्या सर्व आमदारांची आणि सेनेला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची ‘वर्षा’ वर बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व आमदारांना मार्गदर्शन केले. आपले दोन्ही उमेदवारांना राज्यसभेवर पाठवायचे आहे. एका कट्टर कार्यकर्त्याला राज्यसभेवर पाठवायचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना सांगितले आहे. बैठकीनंतर सर्व आमदारांची रवानगी मालाड येथील रिट्रिट या पंचतारांकित हॉटेलवर दोन बसने करण्यात आली. 10 जूनपर्यंत हे आमदार हॉटेलवरच राहणार आहेत. तर उद्या महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलवर होणार आहे. दरम्यान, या बैठकीच्या आधीच भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी अपक्ष आमदारांना फोन करून पाठिंब्यासाठी गळ घातली आहे. तर गिरीष महाजन यांनी बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत दोन तास चर्चा करून त्यांच्या 3 आमदारांचा पाठिंबा भाजपा उमेदवाराला मिळावा, अशी त्यांना विनंती केली.
वर्षा बंगल्यावर आज झालेल्या शिवसेना आणि त्यांना पाठिंबा देणार्या अपक्ष आमदारांची बैठक झाली. यावेळी शिवसेनेचे राज्यसभा उमेदवार संजय पवार यांनी आमदारांसमोर भाषण करून आपल्याला मत देण्याची विनंती केली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राजकीय आमिषाला बळी पडू नका आणि शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला निवडून राज्यसभेवर पाठवा. भाजप राजकारण करत असून भाजपचा हा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपल्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे.
तसेच त्यांनी या आमदारांना आपण जिंकणार असल्याचा विश्वास त्यांना दिला. यावेळी संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह अनेक नेते होते. वर्षावरील बैठक संपल्यानंतर सर्व आमदारांची रवानगी पंचतारांकित हॉटेल रिट्रिटवर झाली. शिवसेनेला पाठिंबा देलेले अपक्ष आमदार या बैठकीला आले होते. शिवसेना या सर्व आमदारांना आता सुरक्षित ठेवणार आहे.
उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि आमदारांची महत्वाची बैठक मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलवर होणार आहे. या बैठकीतून महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करणार आहे. सर्व आमदारांना मतदानाची प्रक्रिया समजाविण्यात आली असून पहिली पसंती, दुसरी पसंती कशी द्यायची ते समजावून मत वाया न जाण्याची काळजी घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने सातवा उमेदवार देऊन निवडणुकीत चुरस वाढवली आहे. मात्र यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता असून भाजपाने त्यांचे तिन्ही उमेदवार जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.