पुणे – पुणे रेल्वे स्थानकावरचा भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध स्तरांवर प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर लोकलसाठी नवा मार्ग सुरू होणार आहे. फलाट क्रमांक एकच्या पाठीमागील बाजूस हा मार्ग बांधण्याची योजना आहे. त्याला यापूर्वीच मंजुरी मिळाली असून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. हा मार्ग पूर्ण होताच शिवाजीनगर स्थानकावरील लोकलची संख्या वाढणार आहे. शिवाजीनगर हे लोकलसाठी टर्मिनेट स्थानक होणार असल्याने येथूनच लोकल सुटेल व थांबेल.
पुण्याहूनच लोकल भरून येत असल्याने अनेकदा शिवाजीनगर स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकलमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे आता शिवाजीनगर येथून लोकल सुटणार असल्याने प्रवाशांना लोकलमध्ये जागा मिळण्यास काही अडचण येणार नाही. दरम्यान, ‘शिवाजीनगर स्थानकावर लोकलसाठी नवा मार्ग बांधण्याचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे स्थानकावरील ताण कमी होण्यास निश्चितच फायदा होईल’, असे पुण्याचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंह यांनी म्हटले आहे.