मुंबई – गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या शेअर बाजाराने आज सकाळीच धडपडायला सुरुवात केली. सेन्सेक्स ६० अंकांच्या घसरणीसह ५२,६२५ वर उघडला, तर निफ्टी ३० अंकांच्या घसरणीसह १५,७१० वर सुरू झाला. तेव्हाच आज दिवसभर बाजारात अस्थिरता दिसून येईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.
संमिश्र जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजार गडगडला होता. सेन्सेक्स १५३ आणि निफ्टी ४२ अंकांनी घसरून बंद झाला. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. ऑटो, एनर्जी, बँकिंग शेअर्सवर दबाव दिसला, तर मेटल, रियल्टी, फार्मा शेअर्समध्ये हलकी खरेदी झाली. दरम्यान, जगभरातील वाढती महागाई, चीनमधील नवे निर्बंध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे बाजारावर सध्या दबाव आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.