मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात शिवडी कोर्टाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीप्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आले असून 18 जुलै रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे.
संजय राऊत यांनी 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याबाबत भ्रष्टाचाराचा आरोप मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्यावर केला होता. शिवडी कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांनी केलेले आरोप हे बदनामीकारक असल्याचे म्हटले आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई महानगर दंडाधिकार्यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध कलम 499, कलम 500 आयपीसीसाठी वॉरंट जारी करण्यात आले आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गेल्या महिन्यात राऊत यांच्याविरुद्ध समन्स जारी करून त्यांना 4 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते.
मात्र राऊत हजर न राहिल्यामुळे त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज केला, त्याला न्यायालयाने परवानगी दिली, असे मेधा सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी सांगितले.