दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी देशातील वाढत्या महागाईच्या विरोधात घोषणा देत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंवरील ५ टक्के जीएसटीविरोधात, अग्निपथ योजनेच्या विरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत कामकाज बंद पाडले. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केल्या. अवघ्या दोन मिनिटांत राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्याची घोषणा उपराष्ट्रपती तसेच पीठासीन अधिकारी व्यंकय्या नायडू यांनी केली.
काॅंग्रेस नेते राहुल गांधी, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, काॅंग्रेसचे अधीर रंजन चौधरी, रामगोपाल यादव यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर येऊन आंदोलन केले. विरोधी पक्षांनी हातात बॅनर घेऊन सरकारच्या विरोधात राग व्यक्त केला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी दूध आणि दह्यावरील जीएसटी मागे घ्या अशा घोषणा दिल्या. जीएसटी कौन्सिलच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर सोमवारपासून अनेक खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. यामध्ये पीठ, पनीर आणि दही यांसारख्या खाद्यपदार्थांवर 5% GST लागू झाला आहे.
लोकसभेत विरोधकांच्या गोंधळावर सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना, सदस्यांना सल्ला दिला आहे. सभागृहाच्या आत आणि बाहेर दुटप्पी भूमिका चालणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. अध्यक्ष म्हणतात, विरोधक बाहेर शेतकरी आणि महागाईवर बोलतात पण सभागृहात शेतकरी आणि महागाई यावर बोलत नाहीत. ते म्हणाले की, गेल्या अधिवेशनात महागाईवर चर्चा झाली होती. तेव्हा विरोधकांनी महागाईवर चर्चाही केली नाही. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी विकास आणि सकारात्मकतेचे आवाहन केले आहे. मात्र, तरीही दुसऱ्याच दिवशी विरोधकांनी आंदोलनाला सुरुवात केली. महागाईच्या मुद्यावरून प्रामुख्याने विरोधक सवाल करत आहेत.