लखनऊ- भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (रावण) यांनी समाजवादी पार्टीबरोबर युतीच्या चर्चेला आज पूर्णविराम दिला. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी आपण अखिलेश यादव यांच्या समाजवादीसोबत युती करणार नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितले. अखिलेश यादव दलित विरोधी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा आमचा कोणताच विचार नाही, असेही ते म्हणाले.
चंद्रशेखर आझाद समाजवादी पार्टीसोबत युती करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अखिलेश यादव आणि चंद्रशेखर यांच्यात बैठकाही होत होत्या. मात्र अखिलेश यादव यांना केवळ दलितांची मते हवे आहेत. त्यांना दलितांसाठी काहीच करायचे नाही. ते दलित विरोधी आहेत. त्यांनी मागासवर्गीयांचा अपमान केला आहे, असे गंभीर आरोप करत चंद्रशेखर आझाद यांनी समाजवादी पार्टीसोबत युती करणार नसल्याचे सांगितले. भाजपला रोखणे हा आमचा मुख्य उद्देश आहे, असे सांगून त्यांनी बसपाच्या नेत्या मायावती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चंद्रशेखर आझाद आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांची शुक्रवारी सपाच्या मुख्यालयात बैठक झाली. सुमारे 50 मिनिटे त्यांनी चर्चा केली. त्यानंतर चंद्रशेखर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये एकतेत मोठा दम असतो, असे म्हटले होते. कणखरपणा आणि एकतेच्या जोरावर भाजपसारख्या मायावीला हरवता येईल. अखिलेश यादव दलितांची ही अपेक्षा पूर्ण करतील, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशात समाजवादी आणि चंद्रशेखर यांच्यात युती होईल, अशी चर्चा होती. परंतु चंद्रशेखर आझाद यांनी आज अचानक घुमजाव करून युती होणार नसल्याचे जाहीर केले.