राजापूर : प्रजननासाठी समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या अधिकाधिक माशांचे प्राण वाचवण्यासाठी तसेच पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रामुळे मच्छिमारांना धोका निर्माणर होऊ नये यासाठी शासनाकडून मच्छिमारी व्यवसायाला पावसाळ्यामध्ये बंदी लागू केली आहे. त्यामुळे सहा महिसापेक्षा अधिक काळ समुद्राच्या पाण्यावर तरांगणाऱ्या मच्छिमारी नौका आणि होड्यांना पावसाळ्याच्या तोंडावर विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे आता समुद्रकिनाऱ्यावर विसावलेल्या होड्यांची डागडुजी करण्यासह रंगकाम करण्यामध्ये मच्छिमार बांधव गुंतले असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, तालुक्याला लाभलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर दीवाळी ते मे महिना अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात मच्छिमारिंचा व्यवसाय चालतो. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या सांगावे, आंबोळगड, जैतापूर, तुळसुंदे आदी गावांतील सुमारे २५० ते ३०० मच्छिमार या हंगामामध्ये मच्छिमारी करत असतात. या काळात केल्या जाणाऱ्या मच्छिमारीवरच तालुक्याच्या या पश्चिम किनारपट्टीतील लोकांचा उदरनिर्वाह चालतो. त्यातून या परिसरामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल दरवर्षी या हंगामामध्ये होते. मटार आता पावसामुळे किनाऱ्यावर विसावलेल्या या होड्या आणि नौकांची डागडुजी आणि किरकोळ दुरुस्ती,रंगकाम करणे आदी कामे करण्यामागे मच्छिमार बांधव सध्या गुंतलेला असल्याचे चित्र किनाऱ्यावर दिसत आहे. मासे पकडण्यासाठी येणारे जाळेही सुकवण्याचे आणि फाटलेल्या जाळ्याची दुरुस्तीची लगबग सध्या सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.