नाशिक – देशात गेल्या अनेक दिवसांपासून हनुमान जन्मभूमीवरून नवा वाद सुरू झाला आहे. कर्नाटकातील किष्किंधा ही हनुमानाची जन्मभूमी असल्याचा दावा किष्किंधाचे महंत गोविंदानंद महाराजांनी केला होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी काल शास्त्रार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, नाशिकमधील शास्त्रार्थ सभेत साधू महंतांमध्येच जोरदार वाद झाला. या शास्त्रार्थ सभेच्या गोंधळानंतर किष्किंधाचे गोविंदानंद महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन ठणकावून सांगितले की, केवळ सरकारी पुरावे दाखवून अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही. दरम्यान, या पत्रकार परिषदेनंतर ते गुजरातला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
शास्त्रार्थ सभेच्या गोंधळानंतर किष्किंधाचे गोविंदानंद महाराज चांगलेच संतापले. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की ,’सरकारचा पुरावा दाखवून अंजनेरी जन्मस्थळ सिद्ध होत नाही. धूर्त लोकांशी पुन्हा चर्चा काय करणार? ज्याने माझ्यावर माईक उचलला त्यांचीच गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे मी ऐकले आहे.’ उद्या मी पत्रकार परिषद घेऊन उत्तरपक्ष मांडणार असल्याचे गोविंदानंद महाराज यांनी सांगितले. गोविंदानंद महाराज पुढे म्हणाले, ‘एक पुस्तक दाखवून मी हे सगळ्यांना सिद्ध करून दाखवेन की किष्किंदा हेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे. नाशिक आणि त्रंबकमधील लोकांना मी आव्हान देतो की माझ्यासारखा रथ बनवून दाखवा आणि शंकराचार्यांच्या हस्ते उद्घाटन करून दाखवा एवढं करता करता तुमचे कपडे उतरून जातील’. शास्त्रार्थ सभा सुरू होण्यापुर्वीच हनुमान जन्मभूमीवरून चर्चा होणे अपेक्षित असताना चर्चा राहिली बाजूला आणि सभेत वर आणि खाली कोणी बसायचे, यावरूनच नाशिकचे साधू-महंत आणि गोविंदानंद यांच्यामध्ये वाद झाला. एवढेच नव्हे तर यावेळी महंत सुधीरदास महाराज यांनी गोविंदानंद महाराज यांच्यावर माईक उगारल्यामुळे या शास्त्रार्थ सभेत साधू-महंतांमध्ये राडा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सुधीरदास यांनी शंकराचार्य सरस्वतींना काँग्रेसी म्हटल्यावरून हा वाद सुरू झाला.