मुंबई – दूरदर्शनच्या सह्याद्री मराठी वाहिनीवर फक्त मराठी भाषेतीलच कार्यक्रम प्रसारित करावेत, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दूरदर्शनला पाठवलेल्या पत्रात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम वगळता दूरदर्शनवरील अन्य सर्व कार्यक्रम मराठीतून प्रक्षेपित करावेत. दूरदर्शनवर सध्या इतर भाषेतील अनेक कार्यक्रम प्रसारित केले जातात. त्याबाबत नागरिकांकडून आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. माहितीच्या अधिकारातूनही ही बाब उघड झाली आहे. यामुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. तेव्हा आमच्या मागणीचा विचार करावा. अन्यथा मनसे त्यासाठी पावले उचलेल, असा इशारा त्यांनी पत्रात दिला आहे.
दूरदर्शनच्या सह्याद्री मराठी वाहिनीवर अलीकडे इतर भाषेतील कार्यक्रम प्रसारित केले जातात. त्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. तेव्हा या वाहिनीवरून केवळ मराठीच कार्यक्रम दाखवले पाहिजेत. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये प्रादेशिक भाषेचा वापर केला जातो. तसा दूरदर्शनही करावा आणि अन्य भाषांचे होणारे अतिक्रमण टाळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.