मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांमुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना यांच्यात शाब्दिक चकमक होत आहे. या निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडोमोडी घडल्याचे पहायला मिळत आहेत. दरम्यान, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत महाविकास आघाडी सरकार आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आठ दिवसांपूर्वी वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशीर बांधकाम कोसळलं या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. याच मुद्द्यावरून बोलताना, नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की,’सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीनं राज्य चालतं’. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु असताना आता शिवसेना-भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढे ते म्हणाले, सध्याची मुंबईची अवस्था पाहता कुणीही अस्वस्थ होऊ शकतो. गुन्हेगारीचं साम्राज्य, भ्रष्टाचाराची दलल मुंबईकरांच्या उंबरठ्यापर्यंत पोहचली आहे. गुरुवारी ९ जूनला तुमच्या निवासस्थानाहून हाकेच्या अंतरावर असलेले वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशीर बांधकाम कोसळलं आहे.
१७ जण जीवन-मरणाशी लढा देत आहेत. ४० वर्षीय युवकाचा बळी गेला. त्या कटुंबांनी फोडलेल्या टाहोने संबंध मुंबईचं काळाजाचा थरकाप उडाला. आपण मात्र तिथं भेट देऊन विचारपुस करण्याची तसदीही घेतली नसल्याचे म्हणत, सत्तेची लालसा, मतांची लालसा जिवघेणी ठरते आहे. मुंबईबाहेरील लोकांच्या मतांच्या लोभात अनाधिकृत बांधकामांना तुमचे नगरसेवक परवानगी देतात. मुबईत १४ फुटाच्यावर वाढीव बांधकाम करण्यास बंदी आहे. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाची मेहर नजर असल्यानं ही बांधकामे सुरु आहेत.अनाधिकृत बांधकामं आता खारफुटी जागांवर पोहचली आहेत. वारंवार अनाधिकृत बांधकामं ढासळत आहेत. यात लोकांचा बळी जातोय. आपण मात्र शांत हा मृत्यूचा तांडव उघड्या डोळ्यानं पाहत आहात. यामुळे निर्माण होणारी तुमची असंवेदनशील मुख्यमंत्र्याची प्रतिमा सामान्यांना हवालदिल करणारी असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.