नवी दिल्ली – देशभरातील लाखो विद्यार्थी सीबीएसई बोर्डाकडून बारावी परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार? या प्रतीक्षेत होते. अखेर आज सकाळी सीबीएसई बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाच्या परीक्षेत एकूण ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ९४.५४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.२५ टक्के आहे. त्यामुळे अभ्यासाच्या बाबतीत पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले. दरम्यान, सीबीएसई बारावी बोर्डाचा महाराष्ट्र राज्याचा निकाल ९०.४८ टक्के आहे.
देशभरातून यंदा १४ लाख ४४ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा दिली होती. कोरोना संकटामुळे सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. दुसऱ्या टर्मची परीक्षा ही एप्रिल-मे महिन्यात घेण्यात आली. त्यामुळे राज्य मंडळाच्या आधी जाहीर होणारा सीबीएसई बारावीचा निकाल यंदा उशिरा जाहीर झाला. परिक्षेनंतर लाखो विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते.