नवी दिल्ली- तिहार तुरुंगात असलेला सुमारे 200 कोटींच्या घोटाळा प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याची प्रकृती खालावली आहे. पत्नीला भेटू द्यावे या मागणीसाठी सुकेशने गेल्या 49 दिवसांपासून तुरुंगातच उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. उपोषणामुळे सुकेशची प्रकृती खालावल्याने त्याला तुरुंगातून थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सधा डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
सुकेशने तिहार तुरुंगातील महिला तुरुंगात असलेली पत्नी मारिया पॉलला आठवड्यातून भेटण्यास परवानगी मिळावी अशी मागणी तुरुंग प्रशासनाकडे केली आहे. या मागणीसाठी तो 23 एप्रिलपासून उपोषणावर आहे. उपोषणामुळे त्याने फारच कमी दिवस अन्नपदार्थांचे सेवन केले आहे. उपोषणाची सुकेशमुळे प्रकृती बिघडू नये यासाठी त्याला दुसर्या बराकीत दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे दाखल करताच त्याची प्रकृती खालावली. अखेर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत बोलताना तिहार कारावासाचे डीजी संदीप गोयल यांनी सांगितले की, सुकेश 23 एप्रिलपासून उपोषणावर असला तरी मधल्या काळात त्याने स्वत: हून उपोषण तोडले आहे. तुरुंगातील नियमाप्रमाणे त्याला त्याच्या पत्नीसोबत महिन्यातून दोन वेळेस भेटण्याची मुभा दिली जाते. हाच नियम इतर कैद्यांनाही आहे. मात्र सुकेशने दर आठवड्याला आपल्या पत्नीला भेटू देण्याची मागणी केली आहे. मात्र, ही मागणी पूर्ण करता येणार नाही, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.