संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

सुबोध जयस्वालांच्या सीबीआय नियुक्तीप्रकरणातून मुख्य न्यायमूर्तींची माघार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- वरिष्ठ आयपीएस अधिकारी,सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्या सीबीआय संचालकपदी झालेल्या नियुक्तीला आव्हान देणारे प्रकरण ऐकण्यापासून उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी काल गुरुवारी स्वतःला दूर ठेवले. याचिकाकर्त्याने आपल्याविरोधात सरन्यायाधीशांकडे तक्रार केल्याने आपण हे प्रकरण ऐकू शकत नसल्याचे मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.
निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र कुमार त्रिवेदी यांनी जनहित याचिका करून जयस्वाल यांच्या नियुक्तीला आव्हान दिले आहे.हे प्रकरण गुरुवारी सुनावणीसाठी आले असता आपण ते ऐकू शकत नसल्याचे मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांनी म्हटले. या प्रकरणातील याचिकाकर्ते त्रिवेदी यांनी आपल्याविरोधात सरन्यायाधीशांकडे तक्रार केली आहे.त्यामुळे आपण हे प्रकरण ऐकू शकत नाही. आम्ही हे प्रकरण अन्य खंडपीठाकडे वर्ग करीत आहोत,असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.त्यावर आपल्या अशिलाने ही तक्रार केलेली नाही.कोणी तरी त्यांच्या नावाचा वापर करून ही तक्रार केली असावी, असा दावा त्रिवेदी यांचे वकील सतीश तळेकर यांनी केला. आपण ही तक्रार केली नसल्याचे त्रिवेदी प्रतिज्ञापत्रावर लिहून देण्यास तयार असल्याचेही तळेकर यांनी न्यायालयाला सांगितले.त्यावर तुमच्या अशिलाने याप्रकरणी नाही, पण अन्य प्रकरणात तक्रार केली असावी.परंतु आपल्याविरोधात तक्रार केल्याने आपण हे प्रकरण ऐकू शकत नसल्याचा पुनरुच्चार करून मुख्य न्यायमूर्तीं दत्ता यांनी प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवले.या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर प्रकरण ऐकले आणि याचिकाकर्त्याच्या विरोधात निकाल गेला तर प्रश्न उपस्थित होऊ शकतात, असेही न्यायालयाने शेवटी नमुद केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami