मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी कर्करोगाशी झुंज देत आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून याचा खुलासा केला. या व्हिडिओमध्ये महिमाने तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचे उघड केले आहे. हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांनी तिला लवकरात लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
व्हिडिओमध्ये महिमा सांगते की कसे अनुपम खेर यांनी तिला एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी यूएसमधून फोन केला, त्यानंतर तिने अनुपमना तिच्या आजाराविषयी सांगितले. या व्हिडिओमध्ये महिमा नेहमीप्रमाणे हसताना दिसत होती. मात्र, बोलता बोलता ती अचानक भावूक झाली. त्यावेळी अनुपम यांनी तिला सावरले आणि तिच्या चेहऱ्यावरील हसू परत आणले. हा व्हिडिओ शेअर करताना अनुपम यांनी महिमाला ‘हिरो’ म्हटले आहे.
महिमाने सांगितले की, ‘तिला स्तनाच्या कर्करोगाची कोणतीही लक्षणे नाहीत. ती दरवर्षी वैद्यकीय तपासणी करून घेते. त्यात बायोप्सी केल्यानंतर तिला या आजाराची माहिती मिळाली. कर्करोग अगदी सुरुवातीच्या टप्प्यात होता, ज्यामुळे ती आता पूर्णपणे बरी होऊ शकते.’ दरम्यान, महिमाचा व्हिडिओ शेअर करताना अनुपम खेर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘महिमा चौधरीच्या धैर्याची आणि कर्करोगाची कहाणी: मी महिमा चौधरीला माझ्या ५२५व्या चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेसाठी सुमारे महिनाभरापूर्वी अमेरिकेतून फोन केला होता. महिमा स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत असल्याचे कळल्यावर आमच्या संभाषणाला वेगळे वळण लागले. ही गोष्ट माझ्याद्वारे जगाला कळावी अशी तिची इच्छा होती. तिने माझे कौतुक केले पण मला सांगायचे आहे की, प्रिय महिमा तू माझी हिरो आहेस. तिची जीवन जगण्याची पद्धत, संघर्ष आणि दृष्टिकोन जगभरातील अनेक महिलांना नवीन प्रेरणा देऊ शकते’, असे अनुपम यांनी म्हटले आहे.