मुंबई- केंद्र सरकारच्या सूचनेनुसार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यात एसटीने पुढाकार घेऊन घरोघरी हा उपक्रम पोहोचवण्याचा निर्धार केला आहे. १,२५० बसमार्फत जाहिरातीतून जनजागृती करून या उपक्रमाची माहिती नागरिकांना देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळ १,२५० बसवर त्याची जाहिरात करणार आहे. राज्यातील २५० आगारांमधील प्रत्येकी ५ बसवर पाठीमागच्या बाजूला जाहिरात केली जाणार आहे. सर्व बस स्थानकांवर जाहिरातीचे फलक लावले जाणार आहेत. या उपक्रमाच्या जनजागृती बरोबरच बस स्थानकांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. रांगोळी काढून स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. बसस्थानक, परिसर आणि बस स्वच्छ केल्या जाणार आहेत. गणवेशासह एसटीचे कर्मचारी उपक्रमात सहभागी होणार आहेत. तो यशस्वी करण्यासाठी सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. याचे काटेकोर पालन करण्याची सूचना प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांना दिली आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम राबवला जाणार आहे. ९ ते १६ ऑगस्ट दरम्यान आगार आणि बस स्थानकांत स्वच्छता सप्ताह पाळला जाणार आहे, अशी माहिती महामंडळाने दिली.