* मेहबूबा मुफ्ती यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट आव्हान
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती या आतापर्यत सातत्याने भाजपवर टीका करत आल्या आहेत.यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या हर घर तिरंगा उपक्रमावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, जर तुमच्या खरोखर हिम्मत असेल तर चीनने अवैधरीत्या बळकावलेल्या लडाखमध्ये तिरंगा फडकावून दाखवा.खरे तर हे भाजप सरकार तिरंग्याचे राजकारण करत आहे.काश्मीर खोऱ्यातील जनतेला घरोघरी तिरंगा फडकावण्यासाठी मजबूर करत आहे.पण ही अशी सक्ती करून काहीही हाती लागणार नसल्याचा घणाघाती टोला मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपला लगावला आहे.
पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती या काल श्रीनगर येथे पक्षाच्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होत्या मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की,मला मोदींना एव्हढेच सांगावेसे वाटते की, तुम्हाला आपल्या देशाला विश्वगुरुच्या रुपात घडवायचे असेल तर त्यासाठी आधी जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करावी लागेल.भारत-पाकिस्तान संबंध जोपर्यंत सुधारले जात नाहीत ,तोपर्यंत काश्मीरचे कधी भले होणार नाही.नुकसानच होणार आहे.जुन्या आक्रमकांनी मशिदी बांधण्यासाठी मंदिरे उध्वस्त केली आणि तुम्ही मंदिरे बांधण्यासाठी मशिदी नष्ट करत आहात,मग तुम्हा दोघांत फरक तो काय उरला असा सवालही मेहबूबा मुफ्ती यांनी यावेळी उपस्थित केला.