नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेच्या बाबतीत ही इमारत जुन्या संसद भवनापेक्षा खूप पुढे आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज ही माहिती दिली. ३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली होती.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘हिवाळी अधिवेशनापासून संसदेच्या नव्या इमारतीत अधिवेशनास सुरुवात होईल असा आमचा प्रयत्न आहे. नव्या इमारतीत आत्मनिर्भर भारताचे चित्र स्पष्टपणे दिसेल. संसदेची जुनी इमारतही त्याचाच भाग असेल. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय येणार नाही याची काळजी घेतली जात आहे.’ तसेच सभागृहात शिस्त आणि शिष्टाचार कायम राहावे अशी आपलीइच्छा आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘एखाद्या खासदाराला आपले म्हणणे मांडायचे असेल तर ते त्याला पूर्ण संधी देतात. मग ते पहिल्यांदाच संसदेत आलेले असो किंवा जुने खासदार असो.’ महत्त्वाचे म्हणजे वाचनालय अधिक चांगले व्हावे यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले असून आता खासदारांसाठी घरपोच पुस्तकांचा पुरवठाही सुरू करण्यात आल्याचे बिर्ला यांनी सांगितले.